मुख्य पृष्ठ > पुणे पुरालेखागार विभाग

पुणे पुरालेखागार विभाग

 • मराठी विभाग

  (मोडीतील) २९४६३ रुमाल

  या विभागातील पोटविभाग खालीलप्रमाणे

  • शाहू दप्तर

   दैनंदिन, हिशेब, खेडेगावचे हिशेब, देणग्या, बक्षिस, धर्मादाय, वतने, इनामे, राज्यकारभार, छत्रपती व त्यांचे अष्टप्रधान निरनिराळे सरदार यांचा खाजगी, राजकारणी राज्य कारभार वगैरेसंबंधीचा पत्रव्यवहार, किल्ले व प्रांताचा बंदोबस्त निरनिराळ्या मोहिमांचा तपशील वगैरेसंबंधीची माहिती यांत आहे यामध्ये एकूण ५७ रुमाल आहेत.

  • पेशवा दप्तर

   या विभागात ८ पोटविभाग आहेत.

   • रोजकीर्द

    यांचे रोजच्या घडामोडीचा तारीखवार तपशील असतो. यांत जमा खर्च या दोन्ही बाबींची कागदपत्रे निरनिराळ्या ठिकाणी ठेवली आहेत. यात हुजूर रोजकीर्द किंवा पेशव्यांची डायरी यांचेही ३ विभाग आहेत.

   • पोता

    (सरकारी खजिन्याचा हिशेब)

   • रवासुदगी

    यात सरकारने आपले सावकार, स्थानिक अधिकारी व ज्या सरदाराकडून सार्वजनिक महसूल येणे आहे अशा लोकांच्या नावावर दिलेल्या हुंड्या (चेक्स) यांची माहिती आहे.

   • दफाता

    देणग्या, महसुली, गावांतील शेती, निरनिराळ्या नेमणुका वगैरेसारख्या कागदपत्रांच्या स्मरणार्थ नोंदी केलेल्या असतात.

   • घडणी

    यांतही रोजकीर्दीतील नोंदीचे हिशेबी कागद आहेत. एकूण रुमाल ९२६ आहेत.

   • जाबसाली पत्रे

    यांत निरनिराळ्या व्यक्तींचा पत्रव्यवहार आहे.

   • प्रांत अजमास

    यामध्ये निरनिराळे प्रांत किंवा प्रशासकीय विभागातील महसुली अंदाजाची माहिती असून हे अंदाज दरवर्षी पेशव्यांच्या मध्यवर्ती कचेरीतून तयार केले जाते. यातील कागदपत्रे मुख्यतः प्रांतवार लावलेली आहेत. या प्रमाणेच जमाव दप्तर म्हणून एक विभाग आहे. पण यांतील कागदपत्रे निरनिराळे जिल्हे व खेडी येथील अधिकाऱ्यांकडून इंग्रज अधिकाऱ्यांनी सत्तांतरासाठी व महसूल ठरविण्यासाठी जमा केलेली आहेत. प्रांत अजमास या विभागात एकूण ५२९७ दप्तरे आहेत.

   • पागा व पथके

    यामध्ये घोडदळ, पायदळ व तोफखान्यासंबधीच्या खर्चाचे हिशेब, पगारपत्रके या दोन्ही विभागात लष्करासंबंधीची माहिती आहे. यामध्ये (६९४+२६८) रुमाल आहेत.

   • चिटणीसी व सुट्टी कागदपत्रे अंशतः

    चिटणीस विभागात प्रामुख्याने राजकारणासंबंधी व राज्यकारभारासंबंधीची कागदपत्रे २६७ रुमालांत आहेत.

  • आंग्रे दप्तर

   यामध्ये एकूण ७६१ रुमाल असून ही कागदपत्रे इंग्रजांनी इ.स. १८४० मध्ये पश्चिम किनाऱ्याचा ताबा घेतल्यावर येथे आणली असावीत. यात २ विभाग असून १ ल्या विभागात इ.स. १७१८ ते १८४० या काळातील रोजकीर्दी व खतावण्या असून दुसऱ्यामध्ये कुलाबा जिल्ह्यांतील तालुक्यांचे हिशेब आहेत.

  • जमाव दप्तर

   हा विभाग अत्यंत महत्वाचा असून यामध्ये क्वचित पेशवाई पूर्वीची कागदपत्रे मिळू शकतात. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या नंतरची कागदपत्रे आहेत. ही सर्व जिल्हेवार, व्यक्तीवार, कीर्दवार याप्रमाणे लावलेली आहेत. जमाव विभागात निरनिराळ्या संस्थानिकांची ही माहिती मिळू शकते. सर्व साधारणपणे इ.स. १६०० ते १८६५ सालापर्यंतची सर्व प्रकारची माहिती या विभागात मिळण्याचा संभव असून यामध्ये एकूण ७,८६४ रुमाल आहेत.

  • इनाम कमिशन चौकशी

   १८४३ ते १८७५ पर्यंत वतने, इनामे वगैरे तंटे निवारणासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी सर्व लोकांकडून गोळा केलेली कागदपत्रे यात असून त्याचे १,८८९ रुमाल आहेत. हे सर्व रुमाल जिल्हेवार ठेवले आहेत. त्यापैकी उत्तर विभागाचे ३१५, मध्य विभागाचे ९२० व परत करावयाचे दप्तर ५०५ रुमाल अशी विभागणी असून यात पानीपतोत्तर काळापासून १८५७ च्या बंडापर्यंतची कागदपत्रे असल्यामुळे यामध्ये बरीच महत्वाची माहिती मिळू शकेल.

  • डेक्कन कमिशनर

   इंग्रजांनी पेशवाई मुलखाच्या बंदोबस्तासाठी केलेल्या व्यवस्थेसंबंधीची दप्तरे यात आहेत. यातील कागद ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहेत. ४ था भाग जमीनदारांच्या वह्या असून यामध्ये १८३५-१८४२ या काळातील जमीनदारांनी केलेल्या कामाचा तपशील आहे. पुणे दप्तरांतील कागदपत्रांचे रजिस्टर केले त्याचा तपशील असून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग नाही.

  • गुजराथी दप्तर

   ५४४ रुमाल

   गुजराथी विभागातील १२९ रुमाल जमाव विभागातील ३०९ रुमाल, ब्रिटीशपूर्व काळातील १०६ रुमाल व परतीच्या कागदपत्रांतील ५ रुमाल हे गुजराथी आहेत.

 • इंग्रजी विभाग

  यात एकूण १६ पोटविभाग असून त्यांना लिस्ट असे म्हणतात. यामध्ये रेसिडेन्सी, सरदारांचे एजंट वगैरेचा सर्व प्रकारचा पत्रव्यवहार रत्नागिरी, कुलाबा जिल्ह्यांच्या फाईली वगैरे विभागवार दप्तरे आहेत.

 • रो. ब. वाड, सरदेसाई वगैरे मान्यवर विव्दान संशोधकांनी संशोधनासाठी पत्रे निवडून त्यापैकी काही पत्रे छापली ते विभाग संशोधनासाठी निवडलेले कागद म्हणून वेगळे ठेवलेले आहेत.