मुख्य पृष्ठ > मोडी लिपीचा इतिहास

मोडी लिपीचा इतिहास

मोडीलिपीच्या कालावधीसंदर्भात अनेक मतांतरे आहेत. काही इतिहासकारांच्या मते मोडी ही मौर्य (ब्राह्मी) लिपीचाच एक प्रकार आहे. मोडी लिपी ही १३ व्या शतकापासून २० व्या शतकापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. मोडी लिपी महाराष्ट्रात कमीतकमी ९०० वर्ष वापरात आहे. मोडीमधील सर्वात जुना उपलब्ध लेख सन ११८९ सालचा आहे. राजा रामदेवराय, राजा महादेवराय, राजा हरपालदेव यादव यांच्या कालखंडात मोडीचा प्रसार प्रामुख्याने झाला. यादवांचे प्रधान हेमाडपंत (१२६०-१३०९) यांना मोडी लिपी लोकाभिमुख करण्याचे श्रेय जाते. मोडी लिपी ही हात न उचलता लिहिली जाते. मोडीमध्ये अनेक शब्दांचे लघूरूप लिहिले जाते. गोलाकार अक्षरांची वळणे तसेच लपेटामुळे ही लिपी सुंदर बनली आहे. मोडी लिपीचे साधारणतः सहा कालखंडात वर्गीकरण केले आहे. आद्यकालीन, यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन.

आद्यकालीन मोडी

ही शैली साधारणतः बाराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती.

यादवकालीन मोडी

राजा रामदेवराय, राजा महादेवराय आणि राजा हरपालदेव यादव यांच्या कालखंडात मोडी लिपीचे पुर्नजीवन झाले. तेराव्या शतकाचा कालखंडापर्यंत म्हणजेच यादव साम्राज्याच्या अखेरच्या कालखंडापर्यंत ही शैली अस्तित्वात होती.

बहामनीकालीन मोडी

बहामनी कालखंडात म्हणजेच चौदाव्य़ा ते सोळाव्या शतकाच्या कालावधीत ही शैली वापरली जात होती.

शिवकालीन मोडी

छत्रपती शिवरायांच्या कालखंडातील मोडी लिपीला शिवकालीन मोडी लिपी असे म्हटले जाते. यादवकालात सुरू झालेला मोडी लिपीचा प्रवास शिवकालात बहरुन आला. साधारणतः सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत याचे अस्तित्व होते.

पेशवेकालीन मोडी

पेशव्यांच्या कालखंडात मोडी लिपी रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळात मोडीचे लिखाण बोरूने होत असे. अठरावे शतक ते एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत याचे अस्तित्व होते.

आंग्लकालीन मोडी

एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या शैलीचे अस्तित्व होते. इंग्रजांच्या कालखंडात मोडी लिपी प्रामुख्याने पेनाने लिहिली जाऊ लागली.ब्रिटीशांनी छपाई यंत्राचा वापर केल्यामुळे लिपीमध्ये एकसारखेपणा आला पण तिचे सौदर्य नष्ट झाले.

वापरायला तसेच छपाईस अवघड असल्यामुळे देवनागरी (बालबोध) लिपीचा वापर ब्रिटीशांनी सक्तीचा केल्यामुळे मोडी लिपीचा वापर कमी झाला. मोडी लिपी सन १९६० पर्यंत लिखाणात अल्पप्रमाणात प्रचलित होती तसेच प्राथमिक अभ्यासक्रमात याचा समावेश होता.